जालना -मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करावा. या प्रमुख मागणीसह मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या संघर्ष समितीचे मुख्य संयोजक प्रदीप सोळुंके यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मराठवाड्यातील मराठा समाजासाठी संघर्ष
मराठवाड्यात मराठा समाजाची अत्यंत दयनीय अवस्था आहे. त्यामुळे विशेष करून अन्य विभागाच्या तुलनेत मराठवाडा मराठा संघर्ष समिती ही मराठवाड्यातील मराठ्यांसाठी संघर्ष करणार आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल न बोलता आपण फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बोलणार असल्याची माहिती मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे मुख्य संयोजक प्रदीप सोळुंके यांनी आज (दि.6 जून) पत्रकार परिषदेत दिली.
ओबीसी आरक्षणाला विरोध
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनीही या आरक्षणाला समर्थन दिले आहे. पण, ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी कोणाचेच समर्थन मिळत नाही, ही एक खेदाची बाब असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यसरकारने 50 टक्केपेक्षा कमी आरक्षण करावे किंवा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून 50 टक्केपेक्षा जास्त आरक्षण वाढवून द्यावे, या दोन्हीपैकी एक पर्याय निवडला तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.