बदनापूर (जालना) -तालुक्यातील राजूर ते दाभाडी या मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. राजूर येथील गणपती हे मराठवाड्यातील प्रमुख देवस्थान आहे. तसेच हा रस्ता पुढे फुलंब्री (औरंगाबाद) कडे जात असल्यामुळे या रस्त्याने प्रचंड वाहतूक सुरू असते. मात्र, संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
जालनातील राजूर-दाभाडी रस्त्याची दुरवस्था; वाहनचालकांमध्ये रोष - सार्वजनिक बांधकाम विभाग बातमी
राजूर ते दाभाडी या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
बदनापूर तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. राजूर ते दाभाडी हा मुख्य रस्ता तर संपूर्ण उखडून गेला आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. अनेक भाविक राजूर येथील गणपती दर्शनासाठी येण्याकरिता याच रस्त्याचा उपयोग करत असतात. मात्र, या रस्त्याची अवस्था अतिशय भयानक झालेली असून संपूर्ण रस्ताच उखडून गेलेला आहे. खडीकरण निघून जाऊन गिट्टी उघडी पडल्यामुळे वाहनांते टायर फुटण्याचे प्रकार होत आहेत.
वाळू वाहतुकीमुळे रस्ता होतो आहे खराब -
वाळू वाहतूक करणारी अनेक जड वाहने याच रस्त्याचा उपयोग करतात. हा रस्ता आडमार्गाने जात असल्यामुळे अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारे या रस्त्यावरून वाहने चालवतात. नियमापेक्षा जास्त वाळूचा भरणा करून ही वाहने भरधाव वेगाने या रस्त्यावरून जात असल्यामुळेच या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली असून अपघाताच्या प्रमाणातही वाढ होत आहे.
नवीन रस्ता तयार करावा -
राजूर हे तीर्थक्षेत्र असून हाच रस्ता दाभाडी मार्गे पुढे फुलंब्री–औरंगाबादकडे जात असल्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन रस्ताच तयार करावा. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे हा रस्ता खराब झाला असून त्याचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना होत आहे. त्यामुळे नविन रस्ता तयार करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
नवीन झालेला रस्ताही उखडला -
राजूर ते विल्हाडी फाटा, हसनाबाद फाटा हा रस्ता मागील वर्षीच बांधण्यात आला. मात्र, अवैध वाळू वाहतुकीमुळे या रस्त्यालाही प्रचंड खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता पूर्णत: उखडला गेलेला आहे. तसेच रस्त्याने वाहने चालवताना खड्डयातून पडून छोटे मोठे अपघात होत आहे. त्यामुळे एका वर्षात रस्ता कसा उखडला, याबाबतही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
हेही वाचा - विधान परिषद निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...