बदनापूर (जालना) -चांगल्या आरोग्यासाठी शुध्द पाणी मिळावे, म्हणून सरकार कोट्यवधींचा खर्च करते. मात्र, बदनापूर तालुक्यातील 20 टक्के गावांमध्ये अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वास्तव समोर आले.
जून महिन्यात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची तपासणी केली असता 90 पैकी 16 गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळून आले. असले तरी वर्षभराचा विचार केला तर या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्यावतीने नियमितपणे पाणी नमुने तपासण्यात आले आहेत. ज्या गावांचे पाणी नमुने दूषित असतील त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीला याची माहिती देण्यात आली.
बदनापूर विभागांतर्गत चार प्राथामिक आरेाग्य केंद्रातील एकूण ९० गावातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आले. विशेष म्हणजे त्यापैकी १६ गावांतील पाण्याचे नमुने दूषित प्राप्त झालेले असल्याचे वास्तव समोर आले. याचा अर्थ २० टक्के गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे कटूसत्य दिसून येत आहे.
ऐन पावसाळ्यात ससंर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव झाल्यास होणाऱ्या आजारांचा मुकाबला कोरोनाच्या संकट काळात तालुक्यातील ग्रामीण जनतेने कसा करावा, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
'या' गावातील पाणी प्रदूषित -
बदनापूर तालुक्यातील दाभाडी, शेलगाव, सोमठाणा व वाकुळणी या चार प्रथामिक आरोग्य केंद्रातंर्गत प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. खामगाव, म्हसला, भातखेडा, किन्होळा, वसंतनगर, सिरसगाव घाटी, लालवाडी ,राजेवाडी, रमदूलवाडी, मात्रेवाडी, शेलगाव व बाजार वाहेगाव, रोशनगाव, पिरसावंगी, हलदोला व कस्तुरवाडी या गावातील पाण्यांचे अहवाल हे दूषित आढळले.