जालना - दर वर्षाचा 31 डिसेंबर हा मद्यप्रेमींसाठी आवडीचा दिवस असतो. तर त्यांच्या जीवाची काळजी घेण्यासाठी पोलीसदेखील तयारीला लागतात. जेणेकरून त्यांच्याकडून दंड वसूल करता येईल आणि त्यांच्या जीवाची काळजी घेता येईल. या दोन्हीही कामांसाठी महामार्ग पोलिसांनी कंबर कसली आहे. 33 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 321 किलोमीटरच्या महामार्गावर नजर ठेवली जाणार आहे.
दुचाकी वाहनांवर करणार कारवाई
31 डिसेंबरनिमित्त सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत तरुणांच्या पार्ट्या रंगतात आणि या नशेमध्येच ते अतिवेगाने दुचाकी, चारचाकी वाहन चालवितात. वाहनाचा वेग किती आहे, याचे भान त्यांना राहत नाही. त्यामुळे अशा वाहनचालकांवर विरुद्ध महामार्ग पोलीस नशेमध्ये वाहन चालवणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे, जादा वेगाने वाहन चालवणे, तसेच चारचाकी वाहनात प्रवास करत असताना सीट बेल्ट न लावणे आदी प्रकारच्या कारवाया करणार आहेत.
जिल्ह्यात 5 महामार्ग
महामार्ग पोलीस या कार्यक्षेत्रात जालना जिल्ह्यामध्ये चार राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्यमार्ग असा एकूण 321 किलोमीटरच्या अंतराच्या महामार्गाचा समावेश आहे. या महामार्गावर सहायक पोलीस निरीक्षक अजय दंडगव्हाळ यांच्या नियंत्रणाखाली 33 पोलीस कर्मचारी या मद्यप्रेमींवर नजर ठेवणार आहेत. तरुणांनी आपल्या जीवाची काळजी करावी आणि नशेमध्ये वाहन चालवू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अजय दंडगव्हाळ यांनी केले आहे.