जालना- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कामगिरीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी राज्य सरकारकडून पोलीस व्हॅनचे रुपांतर सॅनिटायझर व्हॅनमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता जालन्यातदेखील पोलिसांकरिता सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे.
जालन्यात पोलीस व्हॅन बनविले सॅनिटायझर व्हॅन... हेही वाचा-बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही व्हॅन तयार केली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, प्रशांत महाजन आणि बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक संजय व्यास या तिघांच्या प्रयत्नांमधून ही व्हॅन तयार झाली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून वारंवार हात धुण्यासाठी सूचना केल्या जातात. ही सूचना लक्षात घेऊन व्हॅनच्या बाहेरच हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हॅनच्या आतमधील सर्व बाजू प्लास्टिकने बंद करुन शेती आणि यंत्र अन्य कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पिंकलरच्या साह्याने यांमधून सॅनिटाझरची शरीरावर फवारणी होते. शहरातील सर्व भागांमध्ये फिरून त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसाठी ही व्हॅन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा विशेष शाखेने केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनातून त्यांचे कौतुकही होत आहे.