जालना- तीन महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून सामनगाव येथील रामेश्वर खैरेचा हायटेक पत्त्याचा क्लब बंद केला होता. मात्र, पुन्हा त्याने हा पत्याचा क्लब काजळा शिवारातील डाळींबाच्या बागेत स्थलांतरीत करून सुरु केला. या क्लबवर बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून रामेश्वर खैरे व शेतमालकासह ८ जणांना रंगेहाथ पकडले आहे.
बदनापूर तालुक्यात जुगार अड्ड्यावर पुन्हा धाड या धाडीत महागड्या स्कॉर्पिओसह मोटारसायकली, महागडे मोबाईल व रोख रक्कम असा ९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या क्लबवर कारवाई सुरू होती.
सामनगाव शिवारात १० मार्चला सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून १४ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहने जप्त करण्यात आली होती. या कारवाईमध्ये स्वत: पोलीस अधीक्षक एस. चैतन्य सहभागी झाले होते. हा पत्त्याचा क्लब पुन्हा काजळा शिवारातील गट नं. ३५ मधील एका शेतकऱ्याच्या डाळींबाच्या बागेत सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गौर यांनी १५ कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार केले. या पथकाने बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास काजळा शिवारातील गोपाल नारायण खांडेकर या शेतकऱ्याच्या शेतावर धाड टाकली.
यावेळी जुगार खेळताना ८ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पत्त्याच्या क्लबचा मुख्य सुत्रधार रामेश्वर विठ्ठलराव खैरे (रा. सामनगांव), शेतमालक गोपाल नारायण खांडेकर (रा. काजळा), राजेंद्र सखाराम चव्हाण (रा. नुतन वसाहत जालना), प्रल्हाद प्रभाकर भुतेकर (रा. माळी पिंपळगाव), रंगनाथ बाबुराव वासुंबे (रा.देऊळगाव राजा), संदीप गणपतअप्पा निस्ताने (रा. इंदेवाडी), बळीराम प्रभाकर नेमाने (रा. सामनगाव), बाबासाहेब जगनाथ बकाल (रा. कारला) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे.
यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख रुपये किंमतीची एक स्कॉर्पिओ, दीड लाखाची एक बुलेट, दीड लाख रुपये किमतीच्या मोटारसायकली, ७५ हजाराचे ९ मोबाईल्स आणि रोख ४५ हजार १९० रुपये असा एकूण ९ लाख २० हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सध्या काजळा येथे कारवाई सुरू असून यासंदर्भात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपनिरिक्षक जयसिंग परदेशी, सहाय्यक फौजदार शेख रज्जाक, पोलीस कर्मचारी कैलास कुरेवाड, प्रशांद देशमुख, रंजित वैराळ, किरण मोरे, सचिन चौधरी, कृष्णा तंगे, सोमनाथ उबाळे, लखन पचलोरे, किशोर जाधव, हिरामण फलटणकर, राहुल काकरवाल, परमेश्वर धुमाळ, पुनम भट, आशा जायभाये यांनी केली आहे.