जालना -पोलीस प्रशासनात कितीही कर्मचारी असोत कमीच पडतात. अशा परिस्थितीत आहे त्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे ही एक तारेवरची कसरत असते. ही कसरत करताना वेळेची बचत देखील महत्त्वाची असते. हीच बाब लक्षात घेऊन जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी वेळेच्या बचतीसाठी वेगवेगळ्या आवाजाच्या चार घंटा बसवल्या आहेत.
वेळेच्या बचतीसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी अशी लढवली शक्कल - News about Police Inspector Sanjay Deshmukh
जालन्यातील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी वेळेच्या बचतीसाठी एक शक्कल लढवली आहे. त्यांनी प्रत्येक विभागात वेगवेगळ्या आवाजाच्या घंटा बसवल्या आहेत.

वेगवेगळ्या आवाजात चार घंटा -
सदर बाजार पोलिस ठाणे हे तसेच जुन्या इमारतीत आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत जाणारा कामाचा व्याप त्यामुळे टप्प्याटप्प्याने इथे वेगवेगळे विभाग बांधले आहेत. त्यामध्ये ठाणे अंमलदार, गोपनीय शाखा, महिला तक्रार निवारण कक्ष, मुद्देमाल कक्ष, बंदीगृह, समुपदेशन कक्ष असे विविध प्रकारचे कक्ष आहेत. या सर्व कक्षाचे प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे काम पाहतात. वारंवार विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलवावे लागते. त्यामुळे यापूर्वी घंटा वाजली की कधी-कधी दोघे-तिघे यायचे किंवा कधी कोणीच यायचे नाही. यामध्ये खूप वेळ वाया जात होता .मात्र आता त्यांनी स्वतःच्या टेबलवर विविध आवाजाच्या चार घटांचे बटन असलेला बोर्ड ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या कक्षा पासून दूर असलेल्या कक्षात देखील ठराविक आवाजाचे बटन दाबल्या नंतरच त्याच विभागाचा कर्मचारी येतो. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना इकडे येण्याची गरज पडत नाही. पर्यायाने पोलीस निरीक्षकांचा आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या ही वेळ वाचत आहे.