जालना - शहरात नूतन वसाहत भागात भीमराज प्रवेशद्वाराजवळ 23 जुलैला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. या प्रकरणातील मुख्य दोन आरोपींसह इतर दोन आरोपींना घेऊन पोलिसांनी आज (दि. 23 ऑगस्ट) घटनास्थळाची आणि अन्य दोन ठिकाणांची पाहणी केली.
वाळू व्यवसायातून 23 जुलैला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नूतन वसाहत येथील भीमराज प्रवेशद्वाराच्या बाजूला गोळीबार झाला होता. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बारा मुख्य आरोपींसह अन्य पंचवीस ते तीस आरोपींविरुद्ध 24 जुलैला पहाटे तीन वाजता गुन्हा नोंदविला होता.
दरम्यान, तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे न आल्यामुळे सरकारच्या वतीने कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर 13 आरोपींना अटकही करण्यात आली होती. आज (23 ऑगस्ट) आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलिसांनी माऊली मेंगडे, मच्छिंद्र ढगे या दोन मुख्य आरोपींसह विशाल आगळे, निलेश गोरडे, अशा चौगांना घेऊन भीमराज प्रवेशद्वाराची पाहणी केली.