जालना -गेल्या अडीच महिन्यांपासून शहरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी रिकामे लोखंडी ड्रम आडवे टाकून रस्ते बंद केले आहेत. हे ड्रम लंपास करून त्याचा हातभट्टीसाठी वापर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पन्नास हजाराची हातभट्टीची दारू नष्ट केली आहे.
आज शुक्रवारी पोलिसांनी धाड टाकून पन्नास हजाराची हातभट्टीची दारू नष्ट केली आहे. या प्रकरणी एका 17 वर्षीय मुलासह तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यापैकी हा मुलगा सोडून अन्य दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
जालना शहरात लोखंडी ड्रम टाकून पोलिसांनी विविध ठिकाणी रस्ते अडवले. रस्त्यावरील हे ड्रम पळवून नेऊन त्यामध्ये हातभट्टीची दारू साठवली गेली. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार, आज शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जुन्या जालन्यातील डबल जिन भागात छापा मारला.
यावेळी तीन काळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी 35 लिटर गावठी दारू आणि आठ लोखंडी ड्रममध्ये प्रत्येकी शंभर लिटर दारू होती. सुमारे 50 हजार रुपये किंमत असलेली हातभट्टीची दारू पोलिसांनी नष्ट केली आहे.