जालना- सराफाला लुटणाऱ्या औरंगाबाद येथील दरोडखोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. या दरोडेखोरांना औरंगाबादच्या मुकूंदवाडी परिसरातून अटक करण्यात आली. प्रशांत अंकुश हिवाळे, विजय रामकिशन जईद आणि सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील गणेश सांडू बदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सराफाला लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या; 8 लाख 80 हजार रुपये जप्त - औरंगाबाद
सराफा व्यापारी विनय कुमार बाफना व त्यांचा मुलगा नवनीत बाफना हे २४ मे रोजी स्विफ्ट कारने राजूरमार्गे जालन्याकडे येत होते. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीसमोर इंडिका कार आडवी करुन स्कोडा कारने पाठीमागून स्विफ्ट कारला धडक दिली.
भोकरदन तालुक्यातील राजूर येथील सराफा व्यापारी विनय कुमार बाफना व त्यांचा मुलगा नवनीत बाफना हे २४ मे रोजी स्विफ्ट कारने राजूरमार्गे जालन्याकडे येत होते. त्यावेळी जालन्याहून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घाणेवाडी पाटीजवळ दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीसमोर इंडिका कार आडवी केली. त्यानंतर स्कोडा कारने पाठीमागून येऊन स्विफ्टला धडक दिली. या दोन्ही कारच्यामध्ये बाफना यांची गाडी अडकवली. त्यानंतर लोखंडी रॉडने बाफना यांच्या गाडीच्या काचा फोडून त्यांच्याकडे असलेल्या सोन्या-चांदीचे दागिने शस्त्राचा धाक दाखवून पळवून नेले.
याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा दरोडा औरंगाबाद येथील टोळीने टाकल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी रविवारी औरंगाबाद येथील राजनागर, मुकुंदवाडी भागात राहणाऱ्या प्रशांत अंकुश हिवाळे याला ताब्यात घेऊन अधिक माहिती विचारली. यावेळी त्याने त्याच्या अन्य साथीदारांसह हा दरोडा टाकल्याचे कबूल केले. त्याच्यासोबत राजनगर येथीलच विजय रामकिशन जईद आणि सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथील गणेश सांडू बदर या तिघांनी मिळून हा दरोडा टाकल्याचे कबूल केले. या दरोड्यात वापरलेल्या इंडिका आणि स्कोडा या दोन्ही गाड्यांसह पोलिसांनी धारदार शस्त्रास्त्रे आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.