महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाजरीची तिबार पेरणी करूनही उगवले नाही बियाणे, शेतकऱ्याला टोमॅटोतून सापडला समृध्दीचा मार्ग - जालना टोमॅटो बातमी

बदनापूर तालुक्यातील परदेशवाडी (कंडारी बु.) येथील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत २० गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. यातून शेतकऱ्याला लाखाचे उत्पन्न झाले आहे.

Planting tomato in half an acre area
टोमॅटोतून सापडला समृध्दीचा मार्ग

By

Published : Nov 22, 2020, 6:28 PM IST

Updated : Nov 22, 2020, 6:37 PM IST

बदनापूर (जालना) - तालुक्यातील परदेशवाडी (कंडारी बु.) येथील एका शेतकऱ्याने पारंपारिक पध्दतीने शेती करत प्रतिवर्षाप्रमाणे खरीपात बाजरी पेरणी केली. मात्र, अतिवृष्टीमुळे बाजरी उगवलीच नाही. त्याने तीनदा पेरणी करूनही बाजरी उगवली नसल्याने जमीन पडीक राहू नये म्हणून 20 गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. या टोमॅटोतूनच या शेतकऱ्याला समृध्दीचा मार्ग सापडला असून अर्धा एकर क्षेत्रात आतापर्यंत जवळपास एक लाख रुपयांचे उत्पादन निघाले असून अजूनही उत्पादन मिळणार आहे.


परदेशवाडी (कंडारी बु.) येथील छोटूसिंग शिवसिंग दुलत व त्यांच्या पत्नी कासाबाई यांनी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झालेले असताना टोमॅटो उत्पादनातून मिळवलेल्या उत्पन्नामुळे पारंपारिक शेतीपेक्षा आधुनिक व वातावरणाचा अंदाज घेऊन केलेली शेती कधीही फायदेशीर असते हे दाखवून दिले.

टोमॅटोतून सापडला समृध्दीचा मार्ग
अतिवृष्टीमुळे पारंपारिक ऐवजी केले नवे धाडस -छोटुसिंग हे नोकरदार असून त्यांच्या पत्नी कासाबाई याच सर्व शेतीची कामे करतात. पारंपारिक पध्दतीने बाजरी, मका, गहू, हरभरा बरोबरच मोसंबी फळबागांही त्यांनी मेहनतीने व स्वकष्टाने फुलवल्या. छोटूसिंग हेही सुटीच्या दिवशी शेतीत रमतात. यंदाही खरीप हंगामात पारंपारिक बाजरी पिकाची पेरणी या दाम्पत्याने त्यांच्या शेतीत केली. मात्र, अतिवृष्टीने बाजरी उगवलीच नाही. त्यांनी एकूण तीनदा बाजरी पेरणी केली पण न उगवल्यामुळे छोटूसिंग यांनी मिळालेल्या माहितीवरून वैशाली टोमॅटो लावून बघू म्हणून धाडस केले.सेंद्रीय खत व रासायनिक औषधींचा उपयोग -तीनदा बाजरी पेरूनही न उगवल्यामुळे त्यांनी येथील गट क्रमांक 267 मध्ये 20 गुंठे क्षेत्रात 144-वैशाली या टोमॅटोची लागवड केली. यासाठी सेंद्रीय खताबरोबरच रासायनिक औषधे फवारणीचा समन्व्य साधत उत्पादन वाढवले. दररोज चार ते पाच कॅरेट (20 किलोचे एक कॅरेट) टोमॅटो उत्पादन निघायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात दरही चांगला होता. त्यामुळे चांगला फायदा होण्यास सुरुवात झाली.12 ते 15 हजार खर्चात एक लाखाचे उत्पादन -20 गुंठे क्षेत्रात टोमॅटो लागवड केल्यानंतर यासाठी बांबूच्या कामटया लावून तारी ओढण्यात आल्या. यासाठी तसेच लागवड खर्च व औषधी खर्च असा सर्व खर्च आतापर्यंत जवळपास 12 ते 15 हजार रुपये आला असून येथील सर्व कामे हे दाम्पत्यच करत असते. या 20 गुंठयातून निघणारे टोमॅटो करमाड येथील ठोक बाजारात विक्री करण्यात येतात. त्यातून आतापर्यंत जवळपास 1 लाखाचे उत्पादन मिळालेले असून अजूनही टोमॅटो निघत असून उत्पादन सुरूच आहे.याच बांबू व तारांवर लावणार कारले-दोडके -बाजरी न उगवल्यामुळे केलेल्या टॉमेटो लागवडीतून समृध्दीचा मार्ग सापडलेल्या या दाम्पत्याने आता हाच मार्ग चोखळण्याचे ठरवले असून बांबूच्या कामटया व तारा ओढलेल्या असल्यामुळे टोमॅटो झाल्यानंतर ते काढून त्याच ठिकाणी कारले व दोडके लागवड करण्यात येणार असल्याचे दुलत यांनी सांगितले. तारा ओढलेल्या असल्यामुळे आपोआप मंडप तयार होऊन ऐन मार्च/एप्रिलमध्ये कारले, दोडक्याचे उत्पादन मिळून त्यापासूनही चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचे दुलत यांनी सांगितले.
Last Updated : Nov 22, 2020, 6:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details