जालना -शहरातील शिवाजी पुतळा भागातएक गाडी संशयितरित्या उभी करण्यात आले असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना संशय आला. पोलिसांनी गाडीतील व्यक्तीला खाली उतरवून तपासणी केली असता, त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पिस्तूल आणि कार जप्त केली आहे. जिल्ह्यात वर्षभरात सापडलेले हे 7 वे पिस्तूल आहे.
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भागात असलेल्या गंगा हॉटेल समोर एक एक्सेंट कंपनीची कार क्रमांक एम एच २८ एझेड १२८७ उभी होती. या गाडीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागला. त्यांनी त्यांच्या पथकासह या गाडीतील व्यक्तीला खाली उतरून चौकशी सुरू केली. त्यानुसार त्याने त्याचे नाव मनोज मुकूंद वाळके (वय २६) राहणार कन्हैया नगर असे सांगितले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याला या पिस्तूलविषयी माहिती विचारली असता, त्याने चंदंनजिरा येथे राहणाऱ्या अजितसिंह मलकसिंह कलानी (वय २७), याच्याकडून ४० हजार रुपयात ते पिस्तूल विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर अजितसिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले असता, त्याने हे पिस्तूल मनोज वाळके याला विकल्याची कबुली दिली. अजितसिंह कलानीकडे या पिस्तूलबाबत चौकशी केली असता, त्यानेही पिस्तूल नांदेडहून आणल्याचे सांगितले.