जालना-शहरातील दु:खी नगर भागामध्ये पोलिसांनी गुरुवारी रूट मार्च काढला. या रूट मार्च दरम्यान पोलिसांवर पुष्पवर्षाव करून टाळ्यांच्या कडकडाटात पोलिसांचे स्वागत झाले. जालना पोलीस जिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. मात्र, यामुळे लॉकडाऊनमध्ये असलेल्या संचारबंदीला पूर्ण हरताळ फासला गेला. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळता रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गर्दी टाळण्यासाठी पोलीस खडा पहारा देत आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी गर्दी पहायला मिळाली.
संचारबंदीला हरताळ; पोलिसांवर पुष्पवर्षावासाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी - corona positive
रूट मार्च दरम्यान पोलिसांवर पुष्पवर्षाव करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये असलेल्या संचारबंदीला पूर्ण हरताळ फासला गेला. लोकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळता रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गर्दी टाळण्यासाठी पोलीस खडा पहारा देत आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी गर्दी पहायला मिळाली.
जालन्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचा मोठा वाटा आहे. जिवाचे रान करून प्रत्येक चौकाचौकांमध्ये पोलीस ठाण मांडून बसले आहेत. दुःखी नगर भागातील रूट मार्चचे महत्त्व म्हणजे याच भागात 6 एप्रिलला एक महिला कोरोना पॉझिटिव्ह होती. पाचव्या अहवालातही ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे, असे असतानाही पोलिसांनी या भागांमध्ये रुट मार्च काढून पोलीस प्रशासनाचे मनोधैर्य वाढविले आहे, हा पूर्ण भाग बंद केलेला आहे. या भागात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा खडा पहारा आहे. त्यामुळे निश्चितच रुग्ण वाढण्यास आळा बसला असे म्हणता येईल.
एकीकडे पोलीस असा खडा पहारा देत आहेत आणि गर्दी करण्यासाठी मज्जाव करीत आहेत. याच वेळी दुसरीकडे पोलिसांच्या रूट मार्चदरम्यान पोलिसांसमोरच आणि पोलिसांचे कौतुक करण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली आहे. जमलेली गर्दी पोलिसांना विचार करायला लावणारी बाब आहे. कारण जी गर्दी जमू नये म्हणून पोलीस रक्ताचं पाणी करीत आहेत तीच गर्दी पोलिसांमुळे आणि पोलिसांच्या समक्ष जमत असेल तर याला काय म्हणायचे? हा प्रश्न उपस्थित होत आहे?