जालना -राज्यात फटाके विक्रीसाठी दंड आकारण्याची किंवा कायदा करण्याची गरज वाटत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने संवेदनशीलता दाखवून फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
जनता संवेदनशील आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा -
दिवाळीचा सण अगदी तोंडावर येऊन ठेपल्याने फटाकेविक्रीही सुरू झाली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. आपल्या राज्यात घेतलेल्या अनेक निर्णयांचे अनुकरण इतर राज्यांमधील सरकार करतात. दिवाळीत कर्नाटक, दिल्लीसह इतर राज्यांमध्ये सरकारने फटाके विक्रींवर बंदी घातली आहे. मात्र, आपण असा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे संकेत टोपे यांनी दिले आहे. फटाक्यांमधून निघणारा धूर जास्त वर जात नाही. तो मानवाच्या शरीरात जाऊन त्यापासून हानी होते. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन सरकारने केले असल्याचे टोपे म्हणाले.
जनतेने संवेदनशिलता दाखवत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन फटाके उत्पादकांचे नुकसान होण्याची शक्यता -
देशभरातील फटाके उत्पादकांनीदेखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांचे उत्पादन केले असेल. या उत्पादकांसाठी दिवाळी हा मुख्य सण आहे. त्यामुळे विक्रीवर पूर्णतः बंदी घातल्यास त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता टोपे यांनी वर्तवली. राज्यातील जनतेने स्वतःच फटाक्यांसदर्भात निर्णय घ्यावा, असे आवाहन टोपे यांनी केले.