जालना- नगरपालिकेने खासगी कंपनीला कंत्राट देऊन मालमत्तेबाबत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मनमानी पद्धतीने कर आकारणी केली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना कर आकारणीच्या विरोधात केलेल्या तक्रारींवर सुनावणीसाठी नगरपालिका कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
खासगी कंपनीने केलेल्या सर्वेमध्ये एकाच घराची दोन वेळा कर आकारणी, पडक्या घरांना व्यवसायिक कर, व्यवसायिक दुकानांना घरपट्टी, अशा चुकीच्या पद्धतीने मालमत्ता कराची आकारणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिकेमध्ये लेखी तक्रारी केल्या. या तक्रारींची संख्या लक्षात घेता सुनावणीसाठी त्यांना तीस टक्के रक्कम भरून अपील करण्यास सांगितले होते. ज्या नागरिकांनी अपील केले आहे अशा नागरिकांना सोमवार दिनांक १६ पासून सुनावणीच्या तारखा देण्यात आल्या. दर दिवशी ५०० तक्रारी अशा पद्धतीने ही सुनावणी होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी उपविभागीय अधिकारी न आल्यामुळे ही सुनावणी बारगळली आणि दिनांक १७ रोजी नगरपालिकेमध्ये याचिकाकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे पालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला होता.