जालना - अंबड रस्त्यावर पाचोड पॉईंट इथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आमदार नारायण कुचे यांच्यासह अन्य 43 जणांवर गुन्हे दाखल केले होते. या सर्वांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर करून सर्वांची जामिनावर मुक्तता केली आहे.
हेही वाचा -जालन्यात प्रशासनाची परवानगी न घेता बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा, पोलिसांचा बंदोबस्त तैनात
सर्व आरोपींना सर्वांना अंबड येथील तालुका न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, न्यायाधीशांनी अधिकारक्षेत्रात येत नसल्याने हे प्रकरण दाखल करून घेण्यास नकार दिला. कलम 11 चे अधिकार जिल्हा व सत्र न्यायालयाला आहेत, असे तालुका न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर या 44 जणांचे वकीलपत्र घेणारे वकील अॅड. लक्ष्मण अर्जुनराव गायके यांच्यासह अॅड. किशोर राऊत, अॅड. अश्फाक यांनी आरोपींच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
काय आहे कलम 11
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 2 फेब्रुवारी 2005 ला काढलेल्या शासन निर्णयानुसार पुतळे उभारण्यासाठी आणि त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे तसेच अपराध आणि शिक्षेचीही ही तरतूद केली आहे. यामधील प्रकरण-3 नुसार अनाधिकृतपणे पुतळा बसविण्यात बद्दल, कलम 11 अन्वये जी व्यक्ती अनाधिकृतपणे एखादा पुतळा उभारेल किंवा मदत करेल त्या व्यक्तीला पाच वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.