जालना -जिल्हा परिषदेच्या 235 माध्यमिक शिक्षकांचे दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. दसरा, दिवाळी सण तोंडावर आहे. त्यामुळे नवीन खरेदी तर सोडाच मात्र यापूर्वी केलेल्या खरेदीचे हप्ते देखील भरणे मुश्कील झाले आहे. पहिले हप्ते फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज काढण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे शिक्षक जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवत आहेत .मात्र, पगार हाती येण्यासाठी अजून तिसरा महिना ही संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
जालना जिल्हा परिषदेमध्ये 215 माध्यमिक शिक्षक आणि 20 विशेष शिक्षक, असे एकूण 235 शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व शिक्षकांचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पगार अजून झालेला नाही. ऑक्टोबर देखील आता संपत आला आहे. दसरा, दिवाळी हे सण तोंडावर आहेत. या सणाच्या निमित्ताने प्रत्येक जण काही ना काही तरी खरेदी करत असतो. मात्र, शिक्षकांचा पगार झाला नसल्याने पूर्वी घेतलेल्या वस्तूंचे हफ्ते फेडण्यासाठी या शिक्षकांवर दुसरे कर्ज काढण्याची वेळ आली आहे.