जालना - परतूर विधानसभा मतदारसंघात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात आहे. काँग्रेसकडून अद्यापपर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर झाले नाही. परंतु पक्षश्रेष्ठींकडे दिलेल्या मुलाखतीनुसार आणि चर्चेत असलेल्या नावा प्रमाणे काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया आणि विधान परिषदेचे माजी सदस्य धोंडीराम राठोड यांचे चिरंजीव राजेश राठोड ही दोन नावे चर्चेत आहेत.
परतूर विधानसभा मतदारसंघातील लढत काँग्रेस आणि भाजपमधेच होणार यात काही शंका नाही. परंतु दोन पक्षात होत असलेली लढत ही विद्यमान मंत्री आणि माजी आमदार यांच्यात व्हावी, अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे.
हेही वाचा - घनसावंगी : भैय्या-दादाच्या राजकारणात धनुभाऊची उडी!
शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष म्हणून निवडून आलेले माजी आमदार जेथलिया यांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पाणी पुरवठामंत्री लोणीकर यांच्या पत्नीचा पराभव करून त्यांच्या पत्नी विमल जेथलिया यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केले होते. जेथलिया यांची जादूची कांडी आणि आमदारकीचा अनुभव तसेच 4 वर्षात विविध आरोप करून लोणीकर यांचे पितळ उघडे पाडण्याचा त्यांचा प्रयत्न, या सर्व गोष्टी जनतेच्या लक्षात आहेत. त्यामुळे जेथलिया यांना लोणीकर यांच्याविरोधात रान पेटवण्यासाठी सोपे जाऊ शकते. म्हणूनच या दोघांमध्ये खरी लढत व्हावी, अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे.