भोकरदन (जालना) - एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करताना परभणी पोलिसांनी आरोपींच्या कारच्या चाकावर गोळी झाडली. मात्र, पोलिसांचा नेम चुकला आणि आरोपी वाहन घेऊन पसार झाले. तर टोळीतील इतर काही आरोपी शहरात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. बुधवारी (16 जून) साडेबारा वाजण्याच्या सुमारास भोकरदन जाफ्राबाद रस्त्यावरील केळना नदीवरील पुलावर हा थरार घडला.
आरोपी गर्दीतून पसार
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एटीएम फोडणाऱ्या टोळीचा औरंगाबाद येथून पाठलाग करत होते. पाठलागादरम्यान ही टोळी भोकरदन शहरातील जाफराबाद मुख्य रस्त्यावरील केळना नदीच्या पुलाजवळ थांबल्याची माहिती या पथकाला मिळाली. यावेळी टोळीतील आरोपींपैकी काहीजण शहरात काहीतरी खरेदीसाठी उतरले. तर चारचाकी वाहनात असललेल्या संशयित आरोपींना पोलीस मागावर असल्याचे समजताच त्यांनी वाहन भरधाव वेगाने पळविण्यास सुरवात केली. पोलीस पथकानेही पाठलाग सुरू केला. यादरम्यान पोलीस पथकातील एकाने आरोपींच्या वाहनाच्या टायरच्या दिशेने गोळी झाडली. मात्र, नेम हुकला व पुलावर वाहनांच्या गर्दीचा फायदा घेत आरोपीने वाहनासह पळ काढला.
दरम्यान या प्रकरणानंतर वाहनातून उतरलेले इतर आरोपी गर्दीत पसार झाले. तर, पोलिसांनी शहरातील व परिसरातील विविध भागात शोध मोहीम सुरू केली आहे. अचानक घडलेल्या या फिल्मी स्टाईल प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -नागपुरात ब्रँडच्या नावाखाली भेसळयुक्त तेलाची निर्मिती, तिघांवर गुन्हा दाखल