जालना- निसर्गाच्या प्रकोपामुळे वाढत चाललेली नापिकी. शेती करत असताना मेहनतीचे काम करावे लागत असल्यामुळे हल्लीची तरुण पिढी शेती करणे टाळतात. मात्र, तालुक्यातील नांदखेडा येथील रामेश्वर बोचरे हे जन्मत: दोन्ही पायांनी दव्यांग असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी शेतीतील सर्व कामे करून उपजिविका भागवत तरुणांसमोर आदर्श ठेवत आहेत. बदनापूर तालुक्यातील नांदखेडा हे छोटेसे गाव आहे. या गावात 40 वर्षीय रामेश्वर नामदेव बोचरे राहतात. दोन्ही पायांनी ते जन्मत:च दिव्यांग आहे. त्यांना नांदखेडा येथे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी शांताबाई व मुलगी गंगासागर असा परिवार आहे.
दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही हिंमत न हरता बोचरे यांनी शेतीतील सर्व कामे शिकून घेतले. कपाशीत वखर मारणे, निंदणी, कापूस वेचणे, मका सोंगणी आदी कष्टाचे कामे ते लिलिया करतात. हातपायाने धडधाकट असलेल्यांपेक्षाही या कामात ते तरबेज झालेले आहेत. अडीच एकर शेती आणि कायम दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आपली शेती करून ते दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीने मोलमजुरी करतात. शेतीतील कष्टाच्या कामाच्या जोरावर त्यांनी कबाडकष्ट करून मुलीचा विवाह करून दिला असून मुलगी गंगासागर ही मुरुमखेडा गावात सुखाने संसार करत आहे.