जालना -गरीबशहा बाजारात 9 एप्रिल रोजी मध्यरात्री एका गोदामावर छापा टाकून महसूल विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ऑक्सिजनचे अवैध सिलिंडर जप्त केले होते. परवाना दिलेले ठिकाण सोडून इतरत्र या सिलिंडरचा साठा केल्या प्रकरणी परवाना धारकाचा परवाना रद्द करावा व पुढील कारवाई करावी, असे आदेश तहसीलदारांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले.
जालना शहरातील गरीबशहा बाजारात 9 एप्रिलला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त अंजली मिटकरी आणि तहसीलदार श्रीकांत भुजबळ या दोघांनी संयुक्त छापा मारून एका गोदामा मधून 49 सिलिंडर जप्त केले होते. त्यामध्ये मोठे 28 आणि लहान 8 सिलिंडर तसेच काही नायट्रोजनचेही सिलिंडर होते. 49 त्यापैकी 36 सिलिंडर ऑक्सीजन वायूचे असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, याप्रकरणी परवानाधारक आणि अन्न व औषध प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मे. राज इंटरप्राईजेस यांचा अधिकृत परवाना गोल्डन जुबली शाळेच्या बाजूला शंकर नगर येथील आहे. मात्र, त्यांनी परवाना मंजूर नसलेल्या ठिकाणी म्हणजेच गरीबशहा बाजारात ते सिलिंडर साठवून ठेवले होते. या सर्व प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर मे. राज इंटरप्राईजेसचे मालक सतीश सुभाषचंद जैन यांचा परवाना रद्द करावा आणि त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यान्वये कारवाई करावी असे आदेशही दिले आहेत. दरम्यान, जप्त केलेले ऑक्सिजन वायूचे 36 सिलेंडर हे वैद्यकीय वापरा योग्य असल्याची खात्री करून जिल्हा सामान्य रुग्णालय जालना यांच्या ताब्यात वापरासाठी देण्यात यावेत असेही या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा -पैशाच्या वादातून उमरेंची हत्या केल्याची आरोपींची कबूली