जालना - धारदार शस्त्राने गुराख्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घनसावंगी तालुक्यात ही घटना घडली. मारोती विश्वनाथ जाधव (वय 40) असे मृत तरुणाचे नाव आहे.
घनसावंगीत गुराख्याची झोपेतच धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या - जालना हत्या
घनसावंगी तालुक्यात एका गुराख्याचा रात्री झोपेत धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्येचे कारण अजून समजू शकले नाही.
घनसावंगी येथील सूतगिरणीजवळ पत्र्याच्या शेडमध्ये मारोती जाधव आपल्या कुटुंबासह राहत आहेत. शेळ्या सांभाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घराशेजारीच शेळ्यांसाठी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री मारोती जाधव झोपलेले होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास शेळ्या सुटल्याचा आवाज आल्यामुळे त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यावेळी त्यांना पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
घटनेची माहिती कळताच अंबडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अभय देशपांडे, घनसावंगीचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहाच्या मानेवर व गळ्यावर धारदार शस्त्रांचे घाव आहेत. मृताचे भाऊ रामदास जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे.