जालना- भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथे शनिवारी (दि. 7 मार्च) सिमेंटचे खांब घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. यातील खांब अंगावर पडून एकजण ठार झाला आहे.
संतोष उत्तमराव राठोड (वय 34 वर्षे, रा.जैतापूर,ता.जालना), असे मृताचे नाव असून, या दूर्घटनेत अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे, लोणगांव येथे नवीन विद्युत पोल बसवण्याचे काम सुरू आहे. सकाळी अकराच्या सुमारास काहीजण सिमेंटचे पोल ट्रॅक्टरमध्ये टाकण्याचे काम करत होते. पोलच्या ओझ्यामुळे अचानक ट्रॉली उलटल्याने संतोष उत्तमराव राठोड यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे शंकरअप्पा काटकर, गणेश मांटे, वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
राठोड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. मृत संतोषराठोड याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. संतोष राठोड हे मिस्त्री काम करायचे. मात्र, वाळूच्या तुटवड्यामुळे बांधकामे बंद झाल्याने ते पोल उभारणीच्या काम करत होते, असे नातेवाईकांनी सांगितले.
हेही वाचा -वासुदेव आला रे वासुदेव आला... जालन्यात आजही सकाळी येतो 'वासुदेव'