जालना-औरंगाबाद येथील एका मद्यपीने आज (दि. 10 मार्च) दुपारी चार वाजेच्या सुमारास जालना पोलिसांना चांगलेच कामाला लावले. जालना रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा फोन नियंत्रण कक्षाला केला. यामुळे धावपळ सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी त्या मद्यपीला ताब्यात घेतले आहे.
औरंगाबादच्या बेवड्याने केला फोन
औरंगाबाद येथील गोंडा पवार नावाच्या मद्यपीने जालना पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून जालना रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानंतर क्षणार्धात सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली. अवघ्या काही मिनिटांमध्येच जालना रेल्वे स्थानकाला बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घेरले. सोबत श्वानपथक होतेच, मात्र त्याची स्थानकावर आवश्यकताच पडली नाही. बॉम्ब नाशक पथक पूर्ण रेल्वेस्थानकावर फिरून आले आणि शेवटी ही अफवा असल्याचा निष्कर्ष काढला. सुमारे अर्धा तास रेल्वेस्थानक पिंजून काढल्यानंतर काहीच हाती लागले नाही.