बदनापूर शहरात मोकाट फिरणाऱ्यांची ऑन दि स्पॉट अँटीजेन चाचणी! - on the spot antigen-test
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार आपत्ती निवारण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. कुणीही नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
बदनापूर (जालना)- राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सकाळी ७ ते ११ या वेळेव्यवतिरिक्त सर्व औषधी दुकाने व रूग्णालये वगळता आस्थापने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनाकारण रस्त्यावर येण्यास मज्जाव केलेला असतानाही बदनापूर शहरात मोकाट फिरणाऱ्यांची थेट अँटीजेन चाचणी करण्यात आली. सुदैवाने आज (मंगळवार) केलेल्या चाचण्यात कुणीही पॉझिटिव्ह निघले नसले तरी मोकाट फिरणाऱ्यांवर, मात्र चांगलाच चाप बसणार आहे.
पथक बनवून चौकात तपासणी
ब्रेक द चेनतंर्गत जालना जिल्हाधिकारी यांनी गरजेशिवाय रस्त्यावर फिरण्यास मज्जाव केलेला आहे. तरीही बदनापूर शहरात दुपारनंतरही लोक फिरत असतात. अशा लोकांवर चाप बसण्याच्या उददेशाने व रस्त्यावर गर्दी होऊ नये, म्हणून बदनापूर पोलीस प्रशासन, नगर पंचायत प्रशासन व ग्रामीण रूग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मोकाट फिरणाऱ्यांची थेट कोरोना अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार यांच्यासह ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांचे एक पथक रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी आज (दि. २७ एप्रिल) दुपारी १२ नंतर बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर असणाऱ्या २७ जणांची अँटीजेन चाचणी केली. या चाचणीत कुणीही पॉझिटिव्ह आले नसले तरी विनाकारण रस्त्यावर उतरणाऱ्यांवर मात्र, चांगलाच चाप बसणार आहे.
आपत्ती निवारण कायद्याचा कडक अंमल करणार
याबाबत पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी दिलेले आपत्ती निवारण कायद्याचा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. कुणीही नियमांचा भंग केल्यास त्यांच्यावर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच विनाकारण मोकाट रस्त्यावर फिरणाऱ्यांची या पुढेही नियमितपणे अँटीजेन टेस्ट करण्यात येईल. त्यांच्याविरुध्दही दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.