जालना : जालना-अंबड महामार्गावरील अंतरवाला गावाजवळ जालना नगरपालिकेची जलवाहिनी फुटल्यामुळे जुना जालना आणि नवीन जालन्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जालना-अंबड महामार्गावर अंतरवाला गावाजवळ जलवाहिनी दोन दिवसांपूर्वी फुटली आहे. त्यामुळे पाणी खूप मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. पाणी पुरवठा जास्त दिवस बंद राहू नये म्हणून मागील 2 दिवसांपासून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू आहे. पैठण-जालना ही मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरू आहे आणि अशा पाण्याच्या प्रवाहामध्ये जलवाहिनीला नेमके कुठून छिद्र पडले आहे, हे शोधणे जिकिरीचे काम झाले आहे. पाण्याच्या प्रवाहात देखील काम सुरू ठेवून हे छिद्र शोधून ते बंद करण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पाणीपुरवठा सभापती पूनम राज स्वामी या सर्व दुरुस्तीवर लक्ष ठेवून आहेत. जलवाहिनी मुख्य रस्त्याच्या खाली असल्यामुळे जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून युद्धपातळीवर ती दुरुस्त करण्यात येत आहे. मात्र, ही जलवाहिनी रिकामी झाल्यामुळे शहरातील जलकुंभ भरण्यास वेळ लागणार असल्याचेही पूनम स्वामी यांनी सांगितले. त्यामुळे जुना जालना आणि नवीन जालन्यातील काही भागाचा पाणीपुरवठा नियोजित दिवसापेक्षा दोन दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.