जालना - जिल्ह्यात यावर्षी फक्त 50 टँकर पाणीपुरवठ्यासाठी सुरू होते. त्यामुळे कोरोनाची साथ वगळता यंदाचा उन्हाळा जालनाकरांसाठी समाधानकारक राहिला, असे म्हणता येईल. मागील वर्षी भर पावसाळ्यातदेखील पाऊस न पडल्याने शेवटच्या टप्प्यात सातशे ते साडेसातशे टँकर सुरू होते. मात्र, परतीचा पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यातील सर्व तलाव तुडुंब भरले.
जालना शहराला पाणीपुरवठा करणारा जायकवाडी आणि संत गाडगेबाबा तलावदेखील भरून वाहू लागले. त्यामुळे शहराला पाण्याची अडचण भासली नाही. तसेच ग्रामीण भागात यावर्षी सुरुवातीपासून टँकरची मागणी नव्हती. मात्र, शेवटच्या टप्प्यामध्ये 30 जूनपर्यंत जास्तीत जास्त 50 टँकरने पाणीपुरवठा केला गेला. यामध्ये सर्वात जास्त 17 टँकर अंबड आणि बदनापूर तालुक्यात सुरू होते. जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण 50 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला गेला. त्यामध्ये जालना 5, बदनापूर 17, भोकरदन 0, जाफराबाद 5, परतूर 0, मंठा 5, अंबड 17 आणि घनसावंगी 1 अशा एकूण 50 टँकरने हा पाणीपुरवठा करण्यात आला आहे.