जालना - कोरोनाबाधित रुग्णाकडून अतिरिक्त बील आकारल्याप्रकरणी शहरातील संजीवनी सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला जिल्हाधिकार्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरात अंबड चौफुली भागामध्ये हे रुग्णालय आहे.
या रुग्णालयात अंबड तालुक्यातील धाकलगावच्या एकाने दिनांक 11 ते 21 ऑगस्टदरम्यान कोरोना आजारावर उपचार घेतले. बिलामध्ये रुग्णालयाने जास्तीची रक्कम आकारल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी ही नोटीस बजावली आहे.
उपचारादरम्यान शासन निर्णयानुसार बील न आकारता पीपीई किट, रक्त तपासणी आणि एक्स-रे चाचण्यांमध्ये रुग्णालयाने एकूण 10 हजार 580 रुपये जास्त आकारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे बील जास्तीचे का आकारले? यासंदर्भात या रुग्णालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 7 सप्टेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, दहा दिवस उपचार घेतल्यानंतर सदर रुग्णाच्या बिलामध्ये 28 पीपीई कीट वापरल्याचे बिल लावण्यात आले आहे. यासंदर्भात दिनांक 4 सप्टेंबर रोजी लेखापरीक्षकांनीदेखील हे बिल अतिरिक्त वसूल केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संजीवनी सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर आपत्ती व्यवस्थापनाद्वारे दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजवण्यात आली आहे.
हेही वाचा -'गंभीर आरोप केल्यामुळे सरकारने विधानसभेतून पळ काढला'
या रुग्णालयाला महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असतानादेखील हा अतिरिक्त खर्च वसूल केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून काल निघालेली नोटीस आजपर्यंत आपल्याला मिळाली नसल्याची माहिती या हॉस्पिटलचे संचालक डॉ. शिवहरी मिरकड यांनी दिली आहे.