जालना - केंद्रीय औषध मानक तज्ज्ञ संस्थेची (Central Institute of Pharmaceutical Standards) आज बैठक आहे. या बैठकीतून लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस संदर्भात निर्णय होणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. ते जालन्यात बोलत होते. फ्रंट लाईन वर्कर्सना (Front Line Workers) बूस्टर डोस (Booster Dose) देण्यासाठी या संस्थेने भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. या संस्थेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील, असेही टोपे यांनी सांगितले. तसेच राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध नाहीत (No New Restrictions) असेही ते म्हणाले.
- राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध नाहीत -
राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विमान उड्डाणाबाबत केंद्र सरकार सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.
परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधणार आहोत. त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जातील. महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तीकडून कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र, नागरिकांनी लसीकरण तातडीने करून घ्यावे. कोरोना नियमांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.
औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लसीकरण केल्याची खात्री करूनच त्यांना महाविद्यालयात बसू द्या, अन्यथा बसू देऊ नका, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशाचे मी समर्थन करत नाही. मात्र, लसीकरण ऐच्छिक जरी असले तरी ते गरजेचे आहे. आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी तो गरजेचा आहे, असेही टोपे यांनी म्हटले आहे.
- परदेशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू -