जालना -जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीने काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये 31 मार्च पर्यंत दहावी आणि बारावीच्या शाळा वगळता इतर शाळा, हॉस्टेल, कोचिंग क्लासेस, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलन हे सर्व बंद राहणार आहेत. दरम्यान शाळा क्लासेस महाविद्यालय जरी बंद असले तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे टेस्टिंग वाढविणार-
कोरोना रुग्णांचा प्रसार करणाऱ्या महत्त्वांच्या माध्यमांमध्ये व्यापारी, भाजीविक्रेते, ऑटो रिक्षा चालक, यांचा समावेश होतो. सामान्य जनतेच्या जास्त जवळ जाऊन त्यांचा संपर्क वाढतो. त्यामुळे अशा सुपर स्पेडरची टेस्टिंग वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊन नाही-
जनतेने मास्कचा वापर बंद केल्याचे दिसत आहे. तसेच गर्दी देखील जास्त होत आहे. महत्वाचे म्हणजे विदर्भामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विदर्भाला जोडून जालना जिल्ह्याचा भोकरदन आणि जाफराबाद हा भाग येतो. पुढील काळजी घेण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. यादरम्यान शहरांमध्ये आणि जिल्ह्यात मास्क वापरण्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जालना शहरात नगरपालिकेच्या वतीने पथक स्थापन करून ही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
बैठकीला या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती ए बी गरुड प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूर्यकांत सोनखेडकर, जिल्हा परिषदेचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, नगरपालिका प्रशासनाचे राहुल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
हेही वाचा-मुंबईत कोरोना वाढला; मुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक