जालना- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मते देऊन आघाडीची सत्ता स्थापन करा, सत्ता येताच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ असे, आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी परतूर येथे दिले. जालना जिल्ह्यात असलेले परतूर लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, शिवाजी महाराजांचे संताजी-धनाजी हे घोडे ज्याप्रमाणे शत्रूला पाणी पितानाही दिसत होते. त्याच पद्धतीने आमचे विरोधक मोदी यांना प्रत्येक ठिकाणी मी दिसत आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीकेचा भडीमार केला आहे. मात्र, या टीकेमुळे मला फुकट प्रसिद्धी मिळत आहे. असे असले तरी पंतप्रधान मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्याबाबत मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत आम्ही त्यांना संरक्षणाबाबत राजकारण करणार नसल्याचे आश्वासन दिले आणि म्हणूनच सैनिकांना संपूर्ण अधिकार दिले होते. असे असतानाही सैनिकांनी केलेल्या कारवाईचे श्रेय मोदी घेत आहेत आणि आपणच त्यांना अधिकार दिले आहेत, असे सांगत सुटत आहेत. तसे जर असते तर मग मोदींनी तीन वर्षांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जाधवांना का सोडवून आणले नाही? असा प्रश्नही शरद पवार यांनी उपस्थित केला. याच सोबत राफेल घोटाळा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था, शासनाने शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन केलेल्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे झालेले हाल, आदी विषयांवर शरद पवार यांनी टीका केली.