जालना - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वीस वर्षांपासून अडकलेल्या एका खटल्याचा निकाल लावण्यात आला. एका विमा कंपनीचाही सुरू असलेला लाखो रुपयांचा वाद मिटवण्यात आला.
वीस वर्षांपूर्वी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील कैलास फकिरचंद जाधव, शारदा बबन जाधव, मिनाबाई अशोक जाधव यांनी महाराष्ट्र शासनासह अन्य सोळा जणांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यामध्ये उपजिल्हाधिकाऱयांसह दामोदर नारायण जाधव, कौशल्याबाई सर्जेराव जाधव, फकीरचंद सर्जेराव जाधव, सुनील उत्तमचंद लाहोटी, महेश सारस्वत, चंद्रकला अग्रवाल असे सोळा प्रतिवादी होते. मागील वीस वर्षांपासून न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तरीही या प्रकरणाचा निकाल लागत नसल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले.