जालना -आईचे आपल्या मुलांवर असलेले प्रेम जगविख्यात आहे. हे त्रिवार सत्य आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येतो. असाच प्रत्यय जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात आला आहे. इथे प्रसूती झालेल्या मातांनी कोरोनावर विजय मिळवून मातृशक्ती दाखवून दिले आहे. आज मातृदिनाच्या निमित्ताने मातृत्वाचा घेतलेला हा आढावा.
स्त्री रुग्णालय -
मार्च 2020 मध्ये कोरोना आली आणि त्यानंतर सामान्य माणसांपेक्षा कोरोनाबाधित गर्भवती महिलेचे काय करायचे, असा प्रश्न पुढे आला. त्यामुळे अशा महिलांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातच वेगळा विभाग सुरू करण्यात आला. एप्रिल 2020 पासून आत्तापर्यंत कोरोना असलेल्या 185 गर्भवतींची प्रसूती झाली आहे. त्यांना हा आजार असल्यामुळेच येथील वेगळ्या विभागात भरती करण्यात आले होते. या सर्व महिलांची प्रसूती झाल्यानंतर त्यापैकी फक्त तीन बालकांना कोरोनाची लक्षणे होती. मात्र, त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यादेखील ठणठणीत होऊन घरी गेल्या आहेत. 185 महिलांपैकी सर्वच्या सर्व महिलांनी आपल्या मातृशक्तीच्या जोरावर कोरोनावर विजय मिळविला आहे.