जालना- आरोग्यसेवेचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च आणि ग्रामीण भागातील जनतेचे घटत जाणारे उत्पन्न या दोन्हीचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये अत्यावश्यक आरोग्यसेवेसाठी रुग्णांना शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. रुग्णालयाच्या खर्चासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांचा राहण्याचा आणि खाण्या-पिण्याचा खर्चही मोठा होतो. ही बाब लक्षात घेऊन 'राष्ट्रीय आरोग्य मिशन' या योजनेअंतर्गत जालना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे दोन फिरती रुग्णालये (मोबाईल मेडिकल युनिट) उपलब्ध झाली आहेत.
जालन्यातील ग्रामीण भागाच्या सेवेत दोन फिरती रुग्णालये दाखल जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन या फिरत्या व्हॅनच्या माध्यमातून रुग्ण तपासणी केली जाणार आहे. रक्तदाब तपासणी, मधुमेह यापासून ते महिलांच्या प्रसूतीपर्यंत सर्व व्यवस्था या फिरत्या रुग्णालयात करण्यात आली आहे. आधुनिक पद्धतीने ही व्हॅन तयार करण्यात आली असून एका व्हॅनद्वारे रोज 60 रुग्ण तपासणे बंधनकारक आहे. यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागात आरोग्य सेवेसाठी येणाऱ्या रुग्णांचा पैसा आणि वेळ वाचणार आहे.
20 लाख रुपयांचे एक युनिट
जिल्हा परिषदेला दोन फिरती रुग्णालये मिळाली आहेत. प्रत्येकी 20 लाख रुपयांची ही एक व्हॅन आहे. व्हॅनमध्ये वातानुकूलित यंत्रणेपासून ते प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष, विश्रांती कक्ष आहे. या गाडीमध्ये डॉक्टर, नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक चालक असे पाच कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्यामुळे छोट्या आजारापासून ते प्रसूतीपर्यंतच्या मोठ्या आणि इतर आजारांवर उपचार यामध्ये केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेला मिळालेल्या या दोन गाड्या आरोग्य विभागासाठी वरदानच ठरणार आहेत.
खासगी यंत्रणा
रुग्णांना एक रुपयाही खर्च येणार नाही, पूर्णपणे सर्व सेवा मोफत मिळणार आहे. मात्र केलेल्या रुग्णसेवेचा मोबदला हा एका खासगी कंपनीला दिला जाणार आहे. तसेच ही यंत्रणा पूर्णतः खासगी कंपनीची असणार आहे. त्यामुळे यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि तत्सम यंत्रणा ही सरकारी यंत्रणा नसून खासगी यंत्रणा आहे. मात्र, राष्ट्रीय आरोग्य मिशनअंतर्गत एका कंपनीला हे कंत्राट देऊन या कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा हा प्रयत्न आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज दिनांक 28 रोजी या दोन्ही व्हॅन लोकार्पण जिल्हा परिषदेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर आदींची उपस्थिती होती.