महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाण्यासाठी एकत्र येण्याची गरज - नितीन भोसले

पाणी यात्रेच्या निमित्ताने मनसेचे माजी आमदार नितीन भोसले आज जालन्यात आले होते. यावेळी भोसले यांनी पाणी प्रश्नावरून सरकारवर टिका केली.

मनसेचे माजी आमदार नितीन भोसले

By

Published : May 18, 2019, 11:54 PM IST

जालना -एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नाहीत, असे जाहीर करत असतानाच महाराष्ट्राला अंधारात ठेवून ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याची तयारी पूर्ण केली आहे. असा आरोप मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी आज केला. पाणी यात्रेच्या निमित्ताने ते आज जालन्यात आले होते.

मनसेचे माजी आमदार नितीन भोसले

यावेळी नितीन भोसले म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या दबावाखाली येऊन ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार रद्द करून दुष्काळग्रस्त मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या भागाला पाणी देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. जलसिंचन आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अहवालात नार-पार -दमणगंगा खोऱ्यामध्ये १५७ टीएमसी पाणी असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या गोदावरी व गिरणा खोऱ्यापर्यंत उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांमध्ये हे पाणी दिल्यास या परिसरातील दुष्काळ संपुष्टात येऊन दरवर्षी सुमारे १० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न या भागात निर्माण होईल, असा दावाही भोसले यांनी केला.

उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पाणी यात्रेच्या माध्यमातून जनआंदोलन पेटविण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या हक्काचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांमध्ये गुजरात पळवत असलेल्या पाण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात पाणी वाचविण्यासाठी प्रत्यक्ष जन लढ्याची भूमिका घेणार असल्याची माहितीही भोसले यांनी दिली.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दोघांनी एकत्र लढा दिला तरच भविष्यात मराठवाड्याचे होणारे वाळवंट टाळता येईल आणि नाशिकपासून निघालेले गोदावरीचे पाणी नांदेडच्या विष्णुपुरी धरणापर्यंत पोहोचून हा मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असा दावाही भोसले यांनी केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख, मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते शाहूजी भोसले, कमांडंट अविनाश पवार, गजानन गीते, सोलनके बापू यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details