जालना- ओबीसी समाजात मोडत असलेल्या धनगर, बंजारा, धोबी, तेली, वंजारी आधी समाजाने एकत्र येत आज जालन्यात ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा काढला. नवीन जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अंबड चौफुली, भागात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या मोर्चाचा समारोप झाला.
उपस्थिती ओबीसी समाजात येणाऱ्या बंजारा, तेली, धनगर, अशा वेगवेगळ्या समाजातील लोकांनी त्यांच्या पारंपरिक वेशभुषेत मोर्चामध्ये सहभाग नोंदविला होता. महिलांची विशेष उपस्थिती होती. मोर्चादरम्यान घोषणाबाजी करून मल्लखांबाचेही आयोजन करण्यात आले होते.
मुळावर येणाऱ्यांची जिरवणार
अनेक वर्षांपासून ओबीसी जनगणना झाली नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची जनगणना करून समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच आमच्या मुळावर जे येतील त्यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ओबीसी समाज आजही उपेक्षित जगणे जगत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढा उभा करणार आहोत, असे म्हणत असतानाच लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि आरक्षण देण्यासाठी आपण विधानसभेत प्रस्ताव मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रशेखर बावनकुळे
सरकारने आता अंत पाहू नये, ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, यातील मुख्य मागणी ही समाजाच्या जनगणनेची आहे आणि ती 2021 मध्ये पूर्ण करावी अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.