जालना -महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना सोबत घेऊन जालना तालुक्यातील अंतरवाला आणि कुंभेफळ या गावच्या शिवारातील पिकांची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळेलच, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. भेंडी, सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. गोलापांगरीचे शेतकरी मनोज मोरे, नामदेव जराड, राजेंद्र आदे, शेख लालाभाई, अंतरवाला येथील शेतकरी कल्याणराव पडूळ, कुंभेफळचे शेतकरी ईश्वर सोनाजी काटकर, सुभाष आप्पा काटकर, सुदाम कोरडे आदी शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली.
यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी जालना तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महसूल राज्यमंत्री या नात्याने माझ्यावर जिल्ह्यात बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.