जालना -जालन्याचे व्यापारी विमलराज संपतराज सिंघवी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. परतूर येथील व्यापारी राजेश माणकचंद नहार याने विमलराज यांना जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
परतूरच्या व्यापार्याने दिली जालन्याच्या व्यापाऱ्याची सुपारी 31 ऑक्टोबरला पहाटे व्यापारी विमलराज सिंघवी हे सिंदखेडराजा रोडवरील वनविभागाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी सिंदखेडराजाकडून येणाऱ्या वाहनातून एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली. मात्र, नेम चुकल्यामुळे गोळी सिंघवी यांच्या डोक्याला घासून गेली. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी पोलिसांनी खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सोमनाथ उर्फ पप्पू गायकवाड (रा.शिवनगर जालना) याला ताब्यात घेतले होते. घटनेची अधिक चौकशी केली असता, आरोपीने व्यापारी राजेश माणकचंद नहार याच्या सांगण्यावरून आपल्या दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दत्ता जाधव (रा. आंबा) आणि जालिंदर सोलाट (रा.मांडवा), अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा -गुटखा माफियांवर जालना पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा गुटखा जप्त
पोलिसांनी व्यापाऱ्यासह चैघांनाही ताब्यात घेतले असून आरोपींकडून गुन्ह्यामध्ये वापरलेल्या दोन चारचाकी गाड्या आणि एक गावठी पिस्तुल, असा एकूण 8 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी ही कारवाई केली.