बदनापूर (जालना) - महाराष्ट्र कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूमध्येही देशात प्रथम क्रमांकावर आहे. ही संकटकालीन परिस्थितीत हाताळण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारच्या विरोधात 'मेरा आंगण मेरा रणांगण', महाराष्ट्र बचाव आंदोलन बदनापूर येथे करण्यात आले. बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार नारायण कुचे यांनी काळे झेंडे, काळे मास्क व काळे टी-शर्ट घालून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
रिक्षाचालक, टॅक्सीचालक, घरकामगार, बाराबलुतेदारांना भरघोस आर्थिक मदत करा, आधारभूत किमतीवर धान्य खरेदी चालू करा, सरसकट संपूर्ण कर्जमाफी लागू करा, वीज बील माफ करा, शाळेची फी रद्द करा, शिधापत्रिका नसलेल्यांनाही धान्य द्या, शिधापत्रिकेवर साखर, किराणा, डाळ देण्यास सुरुवात करा, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या मोफत प्रवासाची सोय करा, खासगी रुग्णालयात सर्वांना उपचार मोफत करा, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजनांचे पैसे त्वरीत द्या, शेतकऱ्याला बी-बियाणे, खते मोफत उपलब्ध करुन द्या, तीन महिन्यांचे घरभाडे माफ करा, शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीसाठी तत्काळ जास्तीत जास्त प्रमाणात कापूस खरेदी केंद्र चालू करा, पोलिसांवर होणारे हल्ले थांबलेच पाहिजेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.