जालना - जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. आज (शनिवार) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक पार पडली. जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी शासकीय यंत्रणेतील मनुष्यबळ कमी पडेल, अशा वेळी शेजारच्या जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवावे. तसेच जिल्ह्यामध्ये असलेल्या नर्सिंग महाविद्यालयातील परिचारिका तसेच खाजगी डॉक्टर्स यांना देखील सेवेमध्ये पाचारण करावे, असे आवाहन डॉ. मुजीब सय्यद यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रीना बसय्ये, यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी असे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी औरंगाबाद येथील डॉ. मुजीब सय्यद यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि कोरोना विषाणू व आजाराबाबत माहिती दिली.