जालना -राज्य सरकारने18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना लस देण्यास कालपासून (1 मे) सुरुवात केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे. त्यापैकी जालना शहरात पाणीवेस भागामध्ये शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस दिली जात आहे. या केंद्रावर तरुणांनी रांगा लावल्या. मात्र, लस मिळत नसल्यामुळे ते संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
पूर्वनोंदणी आवश्यक
शासनाने ठरवून दिलेल्या अॅपमध्ये नागरिकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसारच या केंद्रांवर लस मिळणार आहे. मात्र, नोंदणी करूनही काहीच उत्तर न आल्यामुळे नागरिकांनी आज (2 मे) या लसीकरण केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, लसीकरणाचा आज दुसरा दिवस आहे. फक्त दीड हजार जणांनाच लस या केंद्रावर पुढील सहा दिवसांमध्ये मिळणार आहेत.
ॲपमध्ये गडबड
लस मिळावी म्हणून ज्या ॲपमध्ये नाव नोंदणी करायचे आहे, त्या ॲपमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामुळे नोंदणी करणारे गोंधळून गेले आहेत. रेल्वेच्या रिझर्वेशनप्रमाणे वारंवार हे ॲप उघडून त्यामध्ये ही लस कधी उपलब्ध होणार आहे? हे आधी पाहावे लागणार आहे. त्यानुसार आपल्याला वेळ घ्यावी लागणार आहे. त्यासाठी नागरिकांना वारंवार या अॅपच्या संपर्कात राहावे लागणार आहे.
जालना जिल्ह्यात या 5 केंद्रांवर मिळणार लस
1. पाणीवेस भागातील नगरपालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
2. ग्रामीण रुग्णालय भोकरदन
3. ग्रामीण रुग्णालय घनसावंगी
4. ग्रामीण रुग्णालय परतुर
5. उपजिल्हा रुग्णालय अंबड