जालना -औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला विशेष कृती दलाच्या पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत. रामदास गणपत बरडे, असे या आरोपीचे नाव आहे.
आरोपी रामदास गणपतराव बरडे (वय २५, रा. जालोर, ता. अंबड) हा आरोपी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची माहिती विशेष कृती दलाचे प्रमुख यशवंत जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन अंबड चौफुली येथील यशवंत धाब्यासमोर सदरील आरोपीला गाठले आणि त्याची विचारपूस केली.
बरडे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस खाक्या दाखवताच त्याने पिस्तूल आणि जिवंत काडतूस हे बीड येथील संतोष जोगदंड यांच्याकडून विकत घेतले असून ते सध्या घरी ठेवलेले आहे, असे सांगितले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि काही साक्षीदारांनी जालोर गाव गाठले आणि रामदास बरडे याच्याकडून घरात ठेवले पिस्तूल आणि जिवंत काडतुसे ताब्यात घेतले.