जालना - गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या लोखंडी पुलाच्या कामात दगड लागून जवान सतीश सुरेश पेहरे यांना वीरमरण आले होते. त्यांचे पार्थिव जालन्यात गावी दाखल झाल्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यत आले. सैन्यामध्ये भरती होताना या जवानाचा पत्ता हा बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना या गावचा होता. मात्र ते आता जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाच्या विनंतीनुसार जालना जिल्ह्यातच अंत्यविधी करण्यात आला.
वीर जवान सतीश पेहेरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, दीड वर्षाच्या मुलाने दिला मुखाग्नी - india china faceoff
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात लोखंडी पुलाचे काम करताना जालन्यातील जवान सतीश पेहरे यांना १४ जुलैला वीरमरण आले होते. आज त्यांच्यावर जालन्यातील वरूड बुद्रुक या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा अर्णव याने आपल्या वीर पित्यास मुखाग्नी दिला. हे मन हेलावणारे दृष्य पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
नातेवाईक, घरच्यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर घरापासून जवळच असलेल्या पेहरे यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. शहीद जवान अमर रहे, अशा घोषणाही दिल्या जात होत्या. सर्व वातावरण भावनिक झाले होते. अंत्यविधीच्या ठिकाणी सैन्य दलाच्या वतीने आणि जालना जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने वीर जवानाला बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून सलामी देण्यात आली. तसेच मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले. वीर जवान सतीश यांचा भाऊ अनिल आणि सतीश यांचा मुलगा अर्णव यांनी सतीश यांच्या चितेला मुखाग्नी दिला.
यावेळी जालना आणि बुलडाणा येथील माजी सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये जालन्याचे व्ही. एम.अनलकर, एस. एस. सोनवणे, विनायक केंद्रे, तर बुलडाण्याचे सेवानिवृत्त मेजर सय्यदा हिरासत, सुदर्शन सोनटक्के, संजय गायकवाड, भास्कर पडघन यांची उपस्थिती होती. महसूल प्रशासनाच्या वतीने जाफराबादचे तहसीलदार सतीश सोनी यांच्यासह सहा. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत मोरे हे उपस्थित होते. मान्यवरांमध्ये पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, भोकरदन-जाफराबादचे आमदार संतोष दानवे, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आदींची उपस्थिती होती.