महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा, सामान्य माणसांची कामे खोळंबली

मराठवाडा महसूल कर्मचारी संघाच्या वतीने शासनाकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोन दिवस सामुहिक रजा आंदोलन पुकारले होते. त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित असलेली सर्व कामे खोळंबली असून याचा फटका सर्वसामान्यांना  बसत आहे.

जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा
जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा

By

Published : Oct 29, 2020, 5:31 PM IST

जालना - मराठवाडा महसूल कर्मचारी संघ औरंगाबाद शाखेच्या महसूल कर्मचाऱ्यांनी दोन दिवस रजा आंदोलन पुकारल्यामुळे सामान्य माणसांची मोठ्या प्रमाणात कामे खोळंबली आहेत. एकाच महिन्यात दुसऱ्या वेळेस आणि तेही दोन दिवस पुकारलेल्या आंदोलनामुळे शासकीय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. आणि याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

जालन्यात महसूल कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा

मराठवाडा महसूल कर्मचारी संघाच्या वतीने शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रमुख मागण्यांमध्ये, अव्वल कारकून यांना नायब तहसीलदारपदी आणि नायब तहसीलदार यांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात यावी, तसेच ज्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे जे कर्मचारी संशयित आहेत किंवा फौजदारी प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, अशा कर्मचाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून पदोन्नती देण्यात यावी, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

यापूर्वी एक ऑक्टोबरला देखील सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी हे आंदोलन एकच दिवसाचे होते. पण, काल दिनांक 28 आणि आज 29 असे दोन दिवस सलग हे आंदोलन करण्यात आले. तर, उद्या शुक्रवार असून ईदनिमित्त सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे आणि त्यानंतर शनिवार-रविवार शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित असलेली सर्व कामे खोळंबली आहेत. बुधवार ते रविवार असे सलग पाच दिवस हे कार्यालय बंद राहणार असल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. महसूल कर्मचारी जास्त करून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय इथेच कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकल्यामुळे दोन्ही ठिकाणचे परिसर कालपासूनच सामसूम दिसत आहेत.

हेही वाचा -पैठणजवळ जलवाहिनी फुटली; जालन्याला ४ दिवस राहणार टंचाई

ABOUT THE AUTHOR

...view details