जालना Maratha Reservation Row :वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हिंसक होण्याची शक्यता असल्यानं त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे. गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच वकील गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत. मात्र मराठा समाजामुळे भाजपाचे 106 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणात आपली माणसं सोडू नये, अशी समज द्यावी, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं केली. मराठा आरक्षण द्या, अन्यथा पुढची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांना विनंती अन् इशारा :मनोज जरांगे पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली. मराठा समाज हा सगळ्यात मोठा समाज आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या हालअपेष्टा करू नका. गोरगरीब मराठा समाजातील पोराबाळांना आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. मात्र मराठा समाज आता दहा दिवस थांबण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सांगतो, हे आग्या मोहोळ शांत आहे, ते उठलं, तर आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
मराठा आरक्षण द्या, ट्रकभर गुलाल घेऊन दिल्लीत येऊ :देवेंद्र फडणवीस हे त्यांचे कार्यकर्ते मराठा आंदोलकांच्या अंगावर घालत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, असंही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे पंतचप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना, त्यांचे कार्यकर्ते मराठा आंदोलकांवर न सोडण्याची समज द्यावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं केली. तुम्ही मराठा आरक्षण दिलं, तर दिल्लीत ट्रकभर गुलाल घेऊन येऊ, असंही मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.