जालना Maratha Reservation Protest : जालन्यातील अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलकांच्या उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केलीय. मुख्य आरोपी बेदरेकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले आहेत. अंतरवाली सराटीच्या राड्यानंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशानं दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याचा शोध घेत असताना तो इतर 2 साथीदारांसह पोलिसांना आढळून आलाय. पोलिसांनी मुख्य आरोपी ऋषीकेश बेद्रेला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
तीन आरोपींना अटक : अंतरवली सराटीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या राड्यानंतर दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. यातील एका आरोपीकडं पोलिसांना गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसं आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस ऋषिकेश बेदरेची कसून चौकशी करत आहेत.