जालना Maratha Reservation Protest : अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलन आता गावागावात पोहोचलय.. मनोज जरांगे पाटील आरक्षणावर आज त्यांची दिशा ठरवणार आहेत. मात्र त्यापूर्वीच जालना जिल्ह्यातील 245 गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. या गावात कोणत्याही पुढाऱ्यांनी येऊ नये, असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात मराठा आंदोलन आणखी चिघळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
जालन्यातील 245 गावांमध्ये राजकीय पुढार्यांना गावबंदी :सकल मराठा समाजाच्या वतीनं राजकीय नेत्यांविरोधात वातावरण तापू लागल्याचं चित्र निर्माण होत आहे. जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 245 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावाबाहेर वेशीवर तशा प्रकारचे बॅनरसुद्धा लावलेले दिसून येत आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावामध्ये कोणत्याही पक्षाच्या राजकीय पुढार्यांना प्रवेश नाही, अशा प्रकारचे बॅनर जाहीरपणे लावण्यात आले आहेत. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं काही गावांनी जाहीर केलं आहे. मराठा आरक्षण हा मुद्दा आता किती पेटला आहे, हेच यावरून दिसून येत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पुढाऱ्यांना येऊ देणार नाही, असा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे. यामुळे राजकीय नेत्यांची मोठी कोंडी झाली आहे.
आज मनोज जरांगे मांडणार भूमीका :अंतरवाली सराटी इथं शांततेत सुरू आसलेल्या आंदोलनावर पोलिसांचा लाठी हल्ला झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं. या आंदोलनाला एक व्यापक वळण मिळालं. तमाम मराठा समाज बांधवांनी स्वतःला या आंदोलनाशी जोडून घेतलं. परिणामी एका छोट्याशा अंतरवाली सराटी गावातून सुरू झालेलं हे आंदोलन राज्यव्यापी आंदोलन बनलं. अशातच आता सरकारला दिलेला चाळीस दिवसाचा अल्टिमेटम सुद्धा 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाची रणनीती काय असेल, यासाठी 22 तारखेला मनोज जरांगे पाटील यापुढील आंदोलन कसं असणार, हे अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.