जालना Maratha Reservation : मराठा आरक्षणच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणास राज्य सरकारच्या शिष्ट मंडळानं भेट दिल्यानंतर शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारून सरकारला दोन महिन्यांची मुदत दिलीय. 24 डिसेंबरनंतर मुंबईच्या सर्व वेशीवर चक्का जाम आंदोलनास सुरुवात करुन मुबंई शहराचं नाक दाबू असा इशारा यावेळी जरांगे यांनी सरकारला दिलाय. तसंच या दोन महिन्याच्या काळात साखळी उपोषण सुरूच राहील असंही त्यांनी म्हंटलय. त्याचबरोबर आपण घरी जाणार नसल्याचं सांगत आरक्षण मिळेपर्यंत उंबरठा ओलंडणार नसल्याचा निर्धार केलाय.
दाखल केलेले खटले मागे घ्या : सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर मनोज पाटील जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेण्याबाबत 27 जिल्ह्यांतून आलेल्या मराठा समाजाची परवानगी घेऊन उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शविली. या वेळी जरांगे यांनी पोलिसांनी अंतरवाली सराटी आणि जालना जिल्ह्यात दाखल केलेले खटले 15 दिवसात मागे घेण्याची मागणी केली. तसंच एका महिन्यात राज्यात दाखल झालेले खटलेही मागे घेण्याची मागणी केली. या सर्व चर्चेतून झालेल्या निर्णयाचा टाईम बॉण्ड सरकारनं दोन दिवसांत करुन द्यावा, असंही त्यांनी म्हटलंय. शिष्टमंडळानं दोन दिवसांत लिखित स्वरूपात दिलं जाईल, अशी शाश्वती मनोज जरांगेंना दिलीय.
चर्चेत नेमक काय घडलं :
1) पुढील दोन महिने न्यायमूर्ती शिंदे यांची समिती महाराष्ट्रभरात काम करेल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भागात कुणबी नोंदी असलेली कागदपत्रे शोधतील.
2) दोन महिन्यांत मराठवाडा आणि महाराष्ट्रातील आरक्षणाबाबत डाटा गोळा होईल.
3) संपूर्ण डाटा व त्याचा सविस्तर अहवाल न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीनं शासनाला द्यावा. त्यानंतर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करावी.
4) ज्या जिल्ह्यातील गावात कुणबी नोदी सापडल्या त्या कुटुंबातील सगळ्या लोकांना नातेवाईकांना, सख्खे रक्ताचे नातेवाईक, रक्ताचे सगळे सोयरे आणि महाराष्ट्रातील मागेल त्या गरजवंताला त्याच अहवालाच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.