जालना :Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा खालावत चालली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी मराठा समाजाच्या काही अटीसुद्धा मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र, जोपर्यंत थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आंदोलन स्थळी येत नाही, तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही, असा पवित्रा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अवधीसुद्धा दिला आहे. या संदर्भात त्यांची रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा झाली आहे. सुमारे ही चर्चा सात ते आठ मिनिटे झाली. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः ही माहिती पत्रकारांना दिली आहे. यावेळी रात्री त्यांच्यासोबत सुमारे साडेदहा ते पावने अकरा वाजेच्या सुमारास मंत्री उदय सामंत,(Uday Samant) संदिपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी प्रत्यक्ष भेटून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. आता मुख्यमंत्री अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांचे उपोषण सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.