जालना: Maratha Reservation:मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. राज्यातील सर्व विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांच्या वतीने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना विनंती करण्यात आली आहे. मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) व माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट (Arjun Khotkar Meets Manoj Jarange Patil) घेत त्यांना विनंती केली की, सरकारला थोडा वेळ द्यावा. मराठा समाजाच्या सर्व अटी सरकार पूर्ण करणार आहे.
आंदोलकांविरोधातले गुन्हे मागे : राज्यातील सर्व विरोधी व सत्ताधारी पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा संदर्भात एकमताने ठराव करण्यात आलाय. राज्य सरकार जी काही भूमिका घेणार आहे त्याला सर्व विरोधी पक्षाने पाठिंबा दिला आहे. राज्यात मराठा आंदोलनादरम्यान जालना जिल्ह्यासह राज्यभरात ज्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले ते तातडीनं मागे घेण्याचा ठराव सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आला. तसंच याबाबत कार्यवाहीला सुरुवातही झाली असल्याची माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.